मुंबई : धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारांनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसराला शनिवारी दिवसभर झोडपून काढले. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबई तुंबली. परिणामी सतत धावणाऱ्या मुंबईच्या वेगाला पावसाचा ब्रेक लागला. रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याने आणि तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा तब्बल अर्धा तास उशिराने धावत असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. मात्र आठवड्याच्या शेवटी आलेल्या या पावसाने तरुणाई सुखावली आणि पावसात धुंद होण्यासाठी आलेल्या हजारो मुंबईकरांनी समुद्र किनारे गजबजून गेले होते.
मुंबई शहरात मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, महालक्ष्मी, भायखळा, लालबाग, परळ, वरळी, दादर, प्रभादेवी आणि सायन परिसरात दुपारी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पश्चिम उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दादर टीटी आणि हिंदमाता या सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. येथे साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गुडघ्याएवढे पाणी असल्याने काही वाहने जागीच बंद पडली. माटुंगा, मोहम्मद अली रोडसह भायखळ््यातही हेच चित्र होते.
मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणे पाण्याखाली जाऊन मुंबईची तुंबई झाल्याने शहर व उपनगरातील नालेसफाईच्या कामाच्या दर्जावर आणि महापालिकेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक कोंडी
पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर शीतल सिग्नल, कमानी जंक्शन येथे साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कालांतराने पाण्याचा निचरा झाला तरी कुर्ला डेपो, कुर्ला-कमानी, घाटकोपर येथील श्रेयस सिनेमालगतच्या वाहतूक कोंडी बराच वेळ कायम होती.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कुर्ला डेपोपासून कलिनापर्यंत आणि चेंबूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कुर्ला आणि अंधेरी परिसरात जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली.
रेल्वेसेवा विस्कळीत
हार्बर मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडासह मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाचा विपरित परिणाम झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल तब्बल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेवर शीव आणि माटुंग येथे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावल्याने चाकरमान्यांना घरी जाण्यास विलंब झाला.
कोकणात अतिवृष्टी
कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हर्णे येथे सर्वाधिक २५१ मिमी, पेडणे २२०, दापोली १७, महाड, पेण १६०, कणकवली, पनवेल, राजापूर येथे प्रत्येकी १५० मिमी पाऊस झाला.
५५ झाडे कोसळली
शहरात १४, पूर्व उपनगरात ११ आणि पश्चिम उपनगरात ३० अशा एकूण ५५ ठिकाणी झाडे कोसळली. तर
६ ठिकाणी घरांचा काही भाग पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मुंबई तुंबली
धोबी तलाव, हिंदमाता, दादर टीटी, माटुंगा येथील गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक ४, कुर्ला येथील शीतल सिग्नल, कमानी जंक्शन, धारावी, एस.व्ही रोड, पूर्व उपनगरात चेंबूर, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरात वाकोला, कांदिवली, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव परिसरात पाणी तुंबले.
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. ३ - वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पालघर येथील म्हासवन पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व पंप बंद करण्यात आले आहेत.
वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणा-या सुर्या नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. जॅकव्हिलमध्ये गाळ जमा झाल्याने पंप चोकअप झाल्याने पाणी पुरवठा बंद केला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर कर्मचा-यांना पंपिंग स्टेशनमध्ये उतरुन गाळ काढता येईल.
वसई-विरार-पालघर क्षेत्रात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या बारा तासात वसई-विरार भागात ११६ मिमी पाऊस झाला आहे.
No comments:
Post a Comment